भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला असल्याची माहिती मिळत आहे.
प्रसाद हे सध्या भारताच्या कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले असून वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी ते उत्सुक आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता, त्या वेळी प्रसाद हे गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम करीत होते. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री व राष्ट्रीय वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही याआधी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला आहे.
जर मुख्य प्रशिक्षकपदाची संधी मिळाली नाही, तर प्रसाद हे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांबरोबरही काम केले आहे.
बलविंदर संधू यांचाही अर्ज
मुंबई : भारताचे माजी मध्यमगती गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांनीही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. ‘‘मी मंगळवारी सायंकाळी ई-मेलद्वारे प्रशिक्षकपदाचा अर्ज दाखल केला आहे. या पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री अग्रेसर आहेत, याची मला कल्पना आहे,’’ असे संधू यांनी सांगितले. क्रिकेटजगतामध्ये ‘बल्लू’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संधू यांनी १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या संघात समावेश असलेल्या शास्त्री आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पटेल यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १० जूनपर्यंत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 4:19 am