News Flash

भारतीय संघाला प्रशिक्षकपदाचा ‘प्रसाद’ मिळणार?

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता.

व्यंकटेश प्रसाद यांचे मैदानावरील अंदाज (संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मार्गदर्शनाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सध्याच्या घडीला रवी शास्री यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने आपल्या पसंतीचे रवी शास्त्री प्रशिक्षकपदी यावेत म्हणून हे सर्व प्रकरण घडवून आणल्याच्या चर्चा रंगत असताना रवी शास्री यांनी प्रशिक्षकपदाचा अर्ज दाखल करुन या गोष्टीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. त्यानंतर आता व्यंकटेश प्रसाद यांनी देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे.

प्रसाद यांनी भारतीय संघाकडून ३३ कसोटी आणि १६२ सामने खेळले आहेत. प्रसाद यांनी कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपदी धुरादेखील सांभाळली आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांनी यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी प्रसाद हे भारतीय संघाच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम करत होते. कुंबळेंची निवड होण्यापूर्वी देखील रवी शास्त्री आणि प्रसाद यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता. यावेळी मुख्य प्रशिक्षकपदाची संधी मिळाली नाही, तर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. भारतीय संघातील योगदानाशिवाय प्रसाद यांनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांबरोबरही काम केले आहे.

२०१६ मध्ये सल्लागार समितीने अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदी निवड केली होती. त्यावेळी सचिनसह सौरव गांगुली आणि लक्ष्मण हे या समितीचे सदस्य होते. याच समितीकडून आता नव्या प्रशिक्षकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यावेळी व्यवस्थापक असलेल्या रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड होईल, असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण ऐनवेळी कुंबळेंचं नाव समोर आल्यानं अनेकांना धक्का बसला होता. तेंडुलकरही शास्त्रींच्या बाजूने होता. पण सौरव गांगुलीनं अनिल कुंबळेंना पसंती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 10:58 am

Web Title: venkatesh prasad applies for india head coachs post after ravi shastri
Next Stories
1 रवी शास्त्रींनी टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हावे ही तर सचिनची इच्छा!
2 भारतापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान
3 विक्रमी विजेतेपदासाठी फेडरर उत्सुक
Just Now!
X