न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम फेरीच्या पाश्र्वभूमीवर व्यंकटेश प्रसाद यांचे मत

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी भारतीय संघाला पुरेसा सराव मिळाला असून प्रत्यक्षात सामन्यात खेळपट्टी आणि वातावरणाशी ते कितपत लवकर जुळवून घेतात, यावर लढतीचा निकाल अवलंबून असेल, असे मत भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केले.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नुकताच इंग्लंडला कसोटी मालिकेत १-० असे नमवून या लढतीसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्याउलट विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २ जूनला इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ सरावात घाम गाळत आहे. भारतीय खेळाडूंना दोन संघांत विभागून त्यांच्यादरम्यान तीनदिवसीय सराव सामना खेळवण्यात आला. त्या पाश्र्वभूमीवर ५१ वर्षीय प्रसाद यांनी भारताला आगामी आव्हानांबाबत सतर्क केले.

‘‘इंग्लंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यामुळे निश्चितच न्यूझीलंडच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असेल. मात्र इंग्लंडमध्ये दाखल होऊन भारतीय संघालाही दोन आठवडे झाले असून खेळाडूंना सरावादरम्यान वातावरणाचा पुरेसा अंदाज आला असेल. त्याशिवाय तंदुरुस्तीचा आढावाही

त्यांनी नक्कीच घेतला असणार. त्यामुळे भारताने अपुऱ्या सरावाचे कारण देऊ नये,’’ असे प्रसाद म्हणाले.

‘‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाद्वारे भारताने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यातसुद्धा पहिल्या सत्रापासूनच त्यांनी वर्चस्व गाजवणे गरजेचे आहे. साऊदम्पटनची खेळपट्टी आणि वातावरणाशी भारतीय खेळाडूंनी लवकर जुळवून घेतले, तर न्यूझीलंडचा संघ दडपणाखाली येईल,’’ असेही प्रसाद यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे वेगवान त्रिकूट आणि रविचंद्रन अश्विन-रवींद्र जडेजा यांच्या फिरकी जोडीसह भारताने मैदानात उतरावे, असे प्रसाद यांनी सुचवले आहे.

विजेत्याला १६ लाख डॉलरचे पारितोषिक

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला १६ लाख डॉलरचे पारितोषिक आणि जेतेपदाची गदा देण्यात येईल, असे ‘आयसीसी’ने जाहीर केले. उपविजेत्याला ८ लाख डॉलर इतकी रक्कम देण्यात येईल. त्याशिवाय स्पर्धेतील अन्य सात संघांनाही त्यांच्या कामगिरीनुसार धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे.

अंतिम सामन्यासाठी वेगवान खेळपट्टी

साऊदम्पटन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी उसळत्या चेंडूंसाठी पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार आहे, असे साऊदम्पटनचे खेळपट्टी विशेषज्ञ सिमॉन ली यांनी सांगितले. ‘‘इंग्लंडमधील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच पोषक असतात. त्यामुळे भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीसाठीसुद्धा आम्ही वेगाने आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंसाठी लाभदायक खेळपट्टी बनवणार आहोत. पहिले दोन दिवस यावर प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असेल,’’ असे ली म्हणाले.