वीरेंद्र सेहवागला भारतीय संघातून डच्चू देण्यामागे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हात होता, असा आरोप भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र त्यानंतर सेहवागच्या गच्छंतीमागे धोनीचा हात असल्याचे सांगणे कठीण असल्याचे सांगत गांगुलीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘‘सचिन तेंडुलकर आणि धोनी हे फॉर्मात नसतानाही त्यांना भारतीय संघात स्थान मिळत असेल तर सेहवागला का मिळू नये? संघनिवड करताना कर्णधाराचा सल्ला ग्राह्य धरला जातो, पण सेहवागला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यामागे धोनीचा हात होता की नाही, हे सांगणे कठीण आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मी, अनिल कुंबळे, धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन असो वा जगातील कोणताही कर्णधार, संघनिवडीबाबत प्रत्येकाचे एक वेगळे मत असते. निवड समिती प्रत्येक वेळी कर्णधाराच्या मागण्यांचा विचार करते, असे नाही. काही वेळा ते कर्णधाराचे म्हणणे मान्य करतात, तर काही वेळा त्याच्या मागण्या धुडकावून लावतात. त्यामुळे सेहवागच्या गच्छंतीमागे धोनीचा हात आहे, हे सांगणे कठीण आहे,’’ असे गांगुलीने स्पष्ट केले.