‘‘इंडियन बॅडमिंटन लीगला (आयबीएल) जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ही स्पर्धा एवढी यशस्वी होईल असे कोणालाही वाटले नव्हते. प्रत्येकजण या स्पर्धेची आयपीएलशी तुलना करत होता. आम्ही आमच्यापरीने ही स्पर्धा मोठी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पहिल्याच आवृत्तीत एवढी मोठी झेप घेणे शक्य नाही मात्र लवकरच आयबीएलला आयपीएलची भव्यता लाभेल,’’ असे मत सायना नेहवालने व्यक्त केले. सातपैकी सात सामन्यात विजयांसह हैदराबाद हॉटशॉट्सच्या विजयात सायनाने निर्णायक भूमिका बजावली.
‘‘दुहेरीत खेळण्याच्या विचाराने माझ्यावर दडपण होते. मी एकेरीची खेळाडू आहे. मार्किस किडो आणि पिआ बर्नाडेथ जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये आहेत. पाचव्या लढतीपर्यंत सामना गेल्यास सर्वोत्तम खेळ करणे हेच माझे उद्दिष्ट होते. मात्र या मातब्बर जोडीविरुद्ध खेळायचे याचा दबाब मनावर होता’, असे सायनाने सांगितले. सिंधूविरुद्धच्या सामन्याबाबत विचारले असता सायना म्हणाली, ‘‘या लढतीचे माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. सवरेत्कृष्ट खेळ करायचा या योजनेनुसार मी खेळले. सिंधूनेही चांगला खेळ केला, पण मी जिंकले याचा आनंद आहे.’’