फॉर्म्युला-वनचे चार वेळा जगज्जेतेपद मिळवणारा सेबॅस्टियन वेटेल या मोसमाअखेरीस फेरारी संघाला सोडचिठ्ठी देणार आहे. एकमेकांसोबत काम करण्याची कोणतीही इच्छा राहिलेली नाही, असे वेटेलने मंगळवारी सांगितले.

फेरारीने जर्मनीच्या वेटेलच्या जागी बदली ड्रायव्हरची घोषणा केलेली नाही. रेड बुलकडून खेळताना वेटेलने चार वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर २०१५मध्ये तो इटलीच्या फेरारी संघात सामील झाला. ‘‘संघाबाहेर जाण्याचा निर्णय हा संयुक्त निर्णय आहे. फेरारीसोबतचे माझे संबंध २०२० अखेरीस संपुष्टात येतील. या खेळात सकारात्मक निकाल मिळवण्यासाठी सर्वानी समान इच्छेने काम करण्याची गरज आहे. संघ आणि माझ्या अपेक्षा वेगळ्या ठरल्याने मी वर्षअखेरीस संघाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला,’’ असे ३२ वर्षीय वेटेलने सांगितले.

फेरारीकडून खेळताना १४ तर कारकीर्दीत एकूण ५३ शर्यती वेटेलने जिंकल्या. माझ्या या निर्णयामध्ये आर्थिक गणिते नाहीत, असे वेटेल सांगत असला तरी कमी मानधनासह एका वर्षांने करारात मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव फेरारीने त्याच्यासमोर ठेवला होता. वेटेलच्या जाण्याने आता फेरारीचा पूर्वीचा ड्रायव्हर तसेच विद्यमान जगज्जेता लुइस हॅमिल्टन परतण्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. मात्र आपण मर्सिडिझ संघासोबतच राहणार असल्याचे संकेत हॅमिल्टनने दिले आहेत. त्याचबरोबर मॅकलॅरेनचा कालरेस सेंझ आणि रेनॉचा डॅनियल रिकार्डियो आणि अँटोनियो जियोविनाझ्झी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.