वयाच्या कोणत्या वर्षी यशस्वी होता येतं, या प्रश्नाचं उत्तर जगातील कोणतीही व्यक्ती देऊ शकणार नाही. अविरत मेहनत घेण्याची वृत्ती, कर्तृत्व, जिद्द, संयम या बळावरच यशस्वी होता येतं, असं म्हटलं जातं. फुटबॉलवर अधिराज्य गाजवणारे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारखे अनेक खेळाडू विश्वचषकात मात्र अपयशी ठरताना दिसत आहेत. त्याउलट नेयमार, अ‍ॅलेक्सी सांचेझ, विलियन, पॉलिन्हो हे नव्या दमाचे खेळाडू विश्वचषकात आपली छाप पाडू लागले आहेत. त्यामुळेच विश्वचषकात यशस्वी होण्यासाठी कोणतं वय लागतं, हा प्रश्न आता सर्वाना पडू लागला आहे.
पावलो रोस्सी, दिएगो मॅराडोना, झिनेदिन झिदान आणि रोनाल्डो या दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी त्यांना महान फुटबॉलपटूचा दर्जा मिळाला. मॅराडोनाने वयाच्या २५ व्या वर्षी अर्जेटिनासाठी १९८६ मध्ये विश्वचषक पटकावत इतिहास घडवला. झिनेदिन झिदानने वयाच्या २५ व्या वर्षीच फ्रान्सला जेतेपद मिळवून दिलं, तर तशीच किमया ब्राझीलच्या रोनाल्डोने २००२ मध्ये केली. दोन वर्षांच्या बंदीनंतर परतलेल्या पावलो रोस्सी यांनी इटलीला १९८२ मध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिलं. आता मेसूत ओझिल, अ‍ॅलेक्सी सांचेझ, दिएगो कोस्टा, विलियन, पॉलिन्हो, जियोवानी दोस सांतोस आणि अ‍ॅक्सेस विस्तेल हे वयाच्या २५ व्या वर्षांत पदार्पण करणारे खेळाडू त्यांची परंपरा ब्राझीलमध्ये चालवतील का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
वयाच्या २५ व्या वर्षी दडपण झेलण्याचा आत्मविश्वास, शारीरिक ऊर्जा आणि अनुभव हा परिपक्व होत असतो, वाढत असतो. अडथळ्यातून मार्ग काढण्याचं मानसिक बळ याच वयात मिळत असतं, असं म्हटलं जातं. मॅच-फिक्सिंगच्या आरोपांमुळे दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आलेले रोस्सी वयाच्या २५ व्या वर्षीच चमकले होते. १९८२ च्या विश्वचषकात पहिल्या चार सामन्यांत एकही गोल लगावू न शकलेल्या रोस्सी यांनी नंतरच्या तीन सामन्यांत ब्राझीलविरुद्धच्या हॅट्ट्रिकसह तब्बल सहा गोल झळकावले. १९८२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी मॅराडोना चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं समर्थपणे पेलू शकले नव्हते. पण चार वर्षांनंतर अर्जेटिनाच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या मॅराडोना यांनी तब्बल १० गोल लगावले होते. झिनेदिन झिदानने याच वयात घरच्या मैदानावर फ्रान्सला जेतेपद मिळवून देत महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं. १९९८ च्या विश्वचषकातील दारुण पराभवानंतर रोनाल्डो निराशेच्या गर्तेत गेला. पण चार वर्षांनंतर दमदार पुनरागमन करताना त्याने आठ गोलांसह ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावताना ब्राझीलला पाचवा विक्रमी विश्वचषक जिंकून दिला. आता वयाच्या पंचविशीत असलेल्या दिग्गज खेळाडूंची नवी पिढी अख्ख्या जगाला थक्क करण्यासाठी सज्ज आहे.
मेसूत ओझिल म्हणजे जर्मनीचा आधारस्तंभ.  २०१० च्या विश्वचषकात त्याने आपल्या कामगिरीने सर्वानाच थक्क केलं. मात्र अर्सेनलकडून पदार्पण करताना पेनल्टी हुकलेल्या ओझिलने त्यानंतर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या विश्वचषकात जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो यांनी त्याच्यावर विश्वास दाखवत महान फुटबॉलपटूंना दिली जाणारी १० क्रमांकाची जर्सी दिली आहे. बार्सिलोनाचा गुणवान खेळाडू म्हणजे अ‍ॅलेक्सी सांचेझ. चिलीच्या या खेळाडूने विश्वचषकाची सुरुवातच गोलने केली होती. त्याच्या गोलमुळे चिलीने ऑस्ट्रेलियावर ३-१ असा विजय मिळवला. ला लीगाच्या गेल्या मोसमात १९ गोल लगावणाऱ्या सांचेझकडून चिलीला मोठय़ा अपेक्षा आहेत. ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फिलीप स्कोलारी हे चेल्सीचा भरवशाचा खेळाडू विलियनच्या प्रेमात आहेत. सलामीच्या सामन्यात स्कोलारी यांनी त्याला संधी दिली नसली तरी ब्राझीलच्या रणनीतीनुसार विलियनची भूमिका ब्राझीलच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भक्कम बचावपटू ही ब्राझीलच्या पॉलिन्होची ओळख. त्याच्या सुरेख कामगिरीमुळे सलामीच्या सामन्यात क्रोएशियाला ब्राझीलची अभेद्य बचावभिंत भेदता आली नाही. अष्टपैलू खेळ करण्याची शैली असलेला पॉलिन्हो हा ब्राझीलसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.
मेक्सिकोच्या जिओवानी दोस सांतोसने टॉटनहॅम हॉट्सपरकडून खेळताना आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. कॅमेरूनविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात जिओवानीचे दोन गोल पंचांनी ऑफसाइड ठरवले. बेल्जियम म्हणजे या विश्वचषकातील ‘डार्क हॉर्स’ समजला जाणारा संघ. पण विश्वचषकात अ‍ॅलेक्स विस्तेल हा खेळाडू खरोखरच ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची शक्यता आहे. इडेन हझार्ड आणि विन्सेन्ट कोम्पानी या दर्जेदार खेळाडूंना मागे टाकत विस्तेल हा बेल्जियमसाठी मुख्य आधारस्तंभ ठरणार आहे. आता वयाच्या २५ व्या वर्षी कोणते खेळाडू विश्वचषकात छाप पाडून महान फुटबॉलपटूंच्या या मांदियाळीत स्थान मिळवतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.