पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असला तरी न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यात भारतासमोर ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला गतविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
न्यूझीलंडवर मात केल्यानंतरही भारताला साखळी फेरीतील अन्य निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. न्यूझीलंडसाठीही हा सामना महत्त्वपूर्ण आहे. भारताने या स्पर्धेत तीन गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया (७ गुण), यजमान मलेशिया (७ गुण) आणि न्यूझीलंड (३ गुण) या संघांनी पहिल्या तीन क्रमांकांवर मजल मारली आहे. ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया यांच्यात मंगळवारी झालेला सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने अन्य चार संघांपुढील आव्हान अधिकच कठीण झाले आहे.
भारताला ऑस्ट्रेलियाकडून ३-४ तर कोरियाकडून १-२ असे निसटते पराभव पत्करावे लागल्यामुळेच भारताची या स्पर्धेत घसरण झाली आहे. भारताने न्यूझीलंडला हरवल्यास आणि पाकिस्तानने मलेशियावर विजय मिळविल्यास भारताचे या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहू शकते. ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाने गुरुवारी होणाऱ्या सामन्यांत विजय मिळविल्यास, शनिवारी होणाऱ्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यांना कोणतेही महत्त्व उरणार नाही.
पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळ उंचावत ३-१ अशा विजयाची नोंद केली. त्यामुळे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांना संघाकडून विजयाची अपेक्षा आहे. ‘‘महत्त्वाच्या सामन्यात भारताने खेळाचा दर्जा उंचावला. मात्र तरीही अद्याप सुधारणेला वाव आहे. न्यूझीलंड संघ भारतापेक्षा सरस असून त्यांना नमविण्यासाठी भारताला विशेष कामगिरी करावी लागेल,’’ असे नॉब्स यांनी सांगितले. भारताचा अखेरचा साखळी सामना मलेशियाशी शनिवारी होणार आहे.