एपी, मिलान

‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीचा थरार आता ऐन भरात असून आवडत्या संघाच्या कामगिरीकडे चाहते आवर्जून लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतींमध्ये बेल्जियम, अर्जेटिना, ब्राझील या बलाढय़ संघांनी विजय नोंदवला. मात्र युरो चषक विजेत्या इटलीला बरोबरीत समाधान मानावे लागले. तर स्पेनला पराभवाचा धक्का बसला.

नामांकित आक्रमणपटू रोमेलू लुकाकूने केलेल्या दोन गोलमुळे बेल्जियमने ‘ई’ गटातील लढतीत इस्टोनियाला ५-२ अशी धूळ चारली. चार सामन्यांतून तीन विजय आणि एका बरोबरीच्या १० गुणांसह बेल्जियम या गटात अग्रस्थानी आहे. ‘क’ गटातील सामन्यात बल्गेरियाने इटलीला १-१ असे बरोबरीत रोखले. तर स्वीडनने स्पेनला २-१ असे नमवून ‘ब’ गटात अग्रस्थान मिळवले.

दक्षिण अमेरिकन देशांच्या पात्रता फेरीत कोपा अमेरिका चषक विजेत्या अर्जेटिनाने व्हेनेझुएलावर ३-१ अशी मात केली, तर ब्राझीलने धोकादायक चिली संघावर १-० असा विजय मिळवला. सलग सात विजयांच्या २१ गुणांसह ब्राझील गुणतालिकेत अग्रस्थानी आहे, तर अर्जेटिना १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एडीन्सन कव्हानी आणि लुइस सुआरेझच्या अनुपस्थितीत उरुग्वेला पेरूने १-१ असे बरोबरीत रोखले.