यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिच, लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांनी गटवार साखळीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. याउलट रेयाल माद्रिदला मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.

गतविजेता बायर्न म्युनिचने लोकोमोटिव मॉस्कोला २-१ असे पराभूत करत या स्पर्धेतील सलग १३ विजयांची घोडदौड कायम राखली. लियॉन गॉरेट्झ्का (१३वे मिनिट) आणि जोशुया किमिच (७९वे मिनिट) यांचा प्रत्येकी एक गोल बायर्नच्या विजयात मोलाचा ठरला. ७०व्या मिनिटाला मॉस्कोकडून अँटन मिरानचुकने गोल करत १-१ अशी बरोबरी साधून दिली होती. मात्र त्यांची ही बरोबरी बायर्नच्या सर्वोत्तम कामगिरीपुढे टिकली नाही. या हंगामातील पहिल्या लढतीतही बायर्नने अ‍ॅटलेटिको माद्रिदला ४-० असे मोठय़ा फरकाने नमवले होते.

रेयाल माद्रिदने पराभव टाळला

रेयाल माद्रिदची चॅम्पियन्स लीगच्या या हंगामातील सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या दोन लढतींत मिळून त्यांना एकाच गुणाची कमाई करता आली आहे. मॉन्चेनग्लॅडबाखविरुद्धच्या लढतीत ८७व्या मिनिटापर्यंत रेयाल माद्रिद ०-२ असा पिछाडीवर होता. या स्थितीत या स्पर्धेच्या इतिहासात सलग चौथा पराभव प्रथमच स्वीकारण्याची वेळ रेयाल माद्रिदवर येते की काय अशी परिस्थिती होती. मात्र करिम बेन्झेमाने ८७व्या मिनिटाला आणि कॅसेमिरोने (९३व्या मिनिटाला) केलेल्या गोलमुळे रेयाल माद्रिदला बरोबरी साधता आली.

बार्सिलोनाचे अध्यक्ष बाटरेमेयू यांचा अखेर राजीनामा

सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीशी झालेल्या जाहीर वादानंतर टीकेला सामोरे जाणारे बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेप बाटरेमेयू यांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनीही पद सोडले. बाटरेमेयू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सार्वमत घेऊन त्यांना हटवण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही. बार्सिलोनासाठी नुकताच झालेला फुटबॉलचा हंगाम हा जवळपास दशकभरातील सर्वात अपयशी ठरला. त्यापाठोपाठ मेसीने बाटरेमेयू यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली होती. तसेच लवकरच बार्सिलोना क्लब सोडण्याचेही जाहीर केले होते.

लिव्हरपूलचे १० हजार गोल

लिव्हरपूलने मिडजीलँड संघाचा २-० असा पराभव केला. लिव्हरपूलच्या दिओगो जोटाने संघाच्या इतिहासातील १०,०००व्या गोलची नोंद करण्याचा मान मिळवला. १२८ वर्षांच्या लिव्हरपूलच्या इतिहासात याबरोबरच सर्व स्पर्धामध्ये मिळून १० हजार गोल पूर्ण झाले. लिव्हरपूलकडून मोहम्मद सालाहने पेनल्टीवर दुसरा गोल केला.