मुंबई : जवळपास ४१ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर अखेरच्या एक किलोमीटरच्या टप्प्यात शर्यत पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या धावपटूंना समोरून येणाऱ्या हौशी धावपटूंची टक्कर होणे, हे मुंबई मॅरेथॉनमधील हमखास दिसणारे चित्र. पण अखेरच्या टप्प्यातील हा विस्कळीतपणा आणि आयोजनातील त्रूटी दूर करण्यासाठी आयोजकांनी आता विजयीरेषेच्या ठिकाणांमध्ये बदल करत नवी शक्कल लढवली आहे. त्यामुळे आता अव्वल धावपटूंना कोणत्याही अडथळ्याविना शर्यत पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनचे १६वे पर्व २० जानेवारी रोजी रंगणार आहे. यंदा तब्बल ४६ हजारांपेक्षा अधिक धावपटू मुंबईच्या रस्त्यांवरून धावणार आहेत. पण मुंबई मेट्रोच्या उभारणीसाठी ठिकठिकाणी सुरू असलेले बांधकाम आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनात गेल्या वर्षी अनेक त्रूटी राहिल्या होत्या. आता काही रस्त्यांची वळणे टाळत सरळ रस्त्यांची निवड केल्याने धावपटूंसाठी यंदाची मुंबई मॅरेथॉन अधिक सुटसुटीत आणि आल्हाददायी ठरण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पूर्ण मॅरेथॉन आणि अर्धमॅरेथॉन शर्यतींचे प्रारंभ ठिकाण आणि विजयीरेषेचे ठिकाण भिन्न ठेवण्यात आले आहे. त्या सर्वाचा फायदा अंतिम रेषेजवळ उडणारा गोंधळ टाळण्यासाठी होणार आहे.

प्रारंभ आणि अंतिम रेषा

हौशी धावपटूंसाठीच्या पूर्ण मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून तर अर्ध मॅरेथॉनला वरळी डेअरीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही शर्यतींची अंतिम रेषा हजारिमल सोमाणी मार्ग येथे असेल. अव्वल धावपटूंच्या पूर्ण मॅरेथॉनला सीएसएमटीपासून सुरुवात होणार असून तेथेच विजयीरेषा असेल. तसेच १० किलोमीटरसह अन्य सर्व गटांच्या शर्यतींचा प्रारंभ छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून होणार आहे. स्पर्धा संचालक ह्य़ू जोन्स यांनी यासंबंधीची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

नामवंत भारतीय धावपटूंवर नजरा

पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये गतविजेता व आशियाई मॅरेथॉनचा विजेता गोपी थोनाकल त्याचबरोबर २०१४ सालचा मुंबई मॅरेथॉनचा विक्रमी धावपटू नितेंद्र सिंग रावत आणि २०१५ चा विजेता करण सिंग यांच्यात विजेतेपदासाठी खरी चुरस रंगणार आहे. गोपी टी. याने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये २ तास १५ मिनिटे २५ सेकंद अशी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. नितेंद्र सिंगने दक्षिण आशियाई मॅरेथॉनमध्ये २०१६ साली २:१५:१८ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. वसई-विरार मॅरेथॉन २०१८ चा विजेता करण सिंग (२:२२:१७) त्यांच्या विजेतेपदात अडसर ठरू शकतो. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये गतविजेती सुधा सिंग आणि दोन वेळची मुंबई मॅरेथॉन विजेती ज्योती गवते भारतीय पथकाचे नेतृत्व करतील. सुधा सिंगने बीजिंग येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २:३५:३५ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. मुंबई मॅरेथॉन २०१७ ची विजेती ज्योती गवते हिने २:५०:५३ सेकंद अशी कामगिरी केली होती. अर्धमॅरेथॉन गटात, पुरुष विभागात कालिदास हिरवे आणि मान सिंग यांच्या कामगिरीकडे नजरा असतील. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये मंजू यादव व साईगीता नाईक यांच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील.