रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या डावाअखेरीस विदर्भने सौराष्ट्रला २०६ धावांचे आव्हान दिले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. आता एका दिवसाचा खेळ शिल्लक असताना सौराष्ट्रला विजयासाठी १४८ धावांची गरज आहे तर विदर्भ दुसऱ्या रणजी विजेतेपदापासून ५ पावलं दूर आहे.

दोन्ही संघाचा पहिला डाव संपल्यानंतर विदर्भकडे ५ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावाला सुरुवात केल्यानंतर विदर्भची सुरुवात खराब झाली. ७३ धावांत त्यांचे ५ गडी तंबूत परतले होते. पण नंतरच्या फलंदाजांनी धावसंख्येत भर घातली. मोहित काळे (३८) आणि गणेश सतीश (३५) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. आदित्य सरवटे याने सर्वाधिक ४९ धावा करत विदर्भला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. पण अखेर त्यांचा डाव २०० धावांत आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रचे गडी झटपट बाद झाले. पहिल्या डावात शतक झळकावणारा स्नेल पटेलदेखील १२ धावांवर बाद झाला. विश्वराज जाडेजा चांगला खेळ करत २३ धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर दिवसअखेर त्यांची अवस्था ५ बाद ५८ झाली.

त्याआधी नाणेफेक जिंकून विदर्भने प्रथम फलंदाजी स्वीकारली. विदर्भचे पहिले ६ बळी केवळ १३९ धावांत माघारी परतले. त्यानंतर अक्षय कर्णेवारने चांगली झुंज दिली आणि दिवसअखेर ७ बाद २०० धावांपर्यंत विदर्भला मजल मारून दिली. त्यापुढे दुसृया दिवसाच्या डावाला सुरुवात झाली. मात्र उपाहारापूर्वीच त्यांचा पहिला डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला. अखेरच्या तीन फलंदाजांनी तब्बल ११२ धावा काढून विदर्भाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अक्षय कर्णेवारने ८ चौकार आणि २ षटकारांसह १६० चेंडूंत शानदार अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने खेळणारा अक्षय वाखरेने कर्णेवारला चांगली साथ दिली. या दोघांनी ७८ धावांची भागीदारी केली. अक्षय वाखरेने तीन चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने ३ तर चेतन सकारिया याने २ गडी बाद केले.

त्यानंतर सौराष्ट्रच्या डावाची सुरुवातदेखील निराशाजनक झाली. १३१ धावांत त्यांचे ५ गडी तंबूत परतले. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत स्नेल पटेलने शतकी खेळी केली. त्याला मंकड (२१), मकवाना (२७), जाडेजा (२३) यांनी चांगली साथ दिली. पटेल बाद झाल्यावर कर्णधार जयदेव उनाडकट याने ४६ धावांची खेळी करत सौराष्ट्रला ३०० पार मजल मारून दिली. तर चेतन सकारियाने नाबाद २८ धावा केल्या. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. पण तरीदेखील त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.