विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत विदर्भाने मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाचं हे सलग दुसरं विजेतेपद ठरलं. स्थानिक क्रिकेटचे चाणाक्य या नावाने परिचीत असलेल्या चंद्रकांत पंडीत यांच्यासाठी ही सर्वात मोठी कामगिरी मानली जाते आहे. प्रशिक्षक या नात्याने चंद्रकांत पंडीत यांचं हे सहावं रणजी विजेतेपद ठरलं आहे.

मुळचे मुंबईचे असलेल्या चंद्रकांत पंडीत यांनी प्रशिक्षक या नात्याने मुंबईला तीनवेळा, राजस्थानला एकदा तर विदर्भाला दोनदा विजेतेपद मिळवून दिलं आहे. याचसोबत खेळाडू म्हणूनही पंडीत यांच्या खात्यात दोन विजेतेपद जमा आहेत.

अवश्य वाचा – बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

अंतिम फेरीत चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी चंद्रकांत पंडीत यांनी फिरकीपटू आदित्य सरवटेला सोबत घेऊन विशेष रणनिती आखली होती. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या पुजाराची फलंदाजीतली उणीव पंडीत यांच्या चाणाक्ष नजरेने अचूक हेरली. याप्रमाणे गोलंदाजी करत आदित्य सरवटेने अचून मारा करत पुजाराला माघारी धाडलं. आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना बाद करत आदित्यने सौराष्ट्राच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.

अवश्य वाचा – रणजी करंडक : बापू नाडकर्णी, अजित वाडेकरांच्या पंक्तीत विदर्भाच्या फैज फजलला स्थान