रणजी करंडक स्पर्धा २०१८-१९ हंगामाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात विदर्भने ५ धावांची निर्णायक आघाडी घेतली. विदर्भने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात सर्वबाद ३१२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा डाव ३०७ धावांवर आटोपला. सौराष्ट्रच्या संघातील फलंदाजांनी फारशी झुंज दिली नाही. पण यष्टीरक्षक स्नेल पटेलच्या १०२ धावा आणि जयदेव उनाडकट (४६) व चेतन सकारिया (२८*) यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेली ६० धावांची भागीदारी याच्या जोरावर सौराष्ट्रने ३०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता उर्वरित दोन दिवसांचा खेळ संपेपर्यंत जर सामन्याचा निकाल लागला नाही, तर विदर्भला सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.

 

नाणेफेक जिंकून विदर्भने प्रथम फलंदाजी स्वीकारली. विदर्भचे पहिले ६ बळी केवळ १३९ धावांत माघारी परतले. त्यानंतर अक्षय कर्णेवारने चांगली झुंज दिली आणि दिवसअखेर ७ बाद २०० धावांपर्यंत विदर्भला मजल मारून दिली. त्यापुढे दुसृया दिवसाच्या डावाला सुरुवात झाली. मात्र उपाहारापूर्वीच त्यांचा पहिला डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला. अखेरच्या तीन फलंदाजांनी तब्बल ११२ धावा काढून विदर्भाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अक्षय कर्णेवारने ८ चौकार आणि २ षटकारांसह १६० चेंडूंत शानदार अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने खेळणारा अक्षय वाखरेने कर्णेवारला चांगली साथ दिली. या दोघांनी ७८ धावांची भागीदारी केली. अक्षय वाखरेने तीन चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने ३ तर चेतन सकारिया याने २ गडी बाद केले.

त्यानंतर सौराष्ट्रच्या डावाची सुरुवातदेखील निराशाजनक झाली. १३१ धावांत त्यांचे ५ गडी तंबूत परतले. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत स्नेल पटेलने शतकी खेळी केली. त्याला मंकड (२१), मकवाना (२७), जाडेजा (२३) यांनी चांगली साथ दिली. पटेल बाद झाल्यावर कर्णधार जयदेव उनाडकट याने ४६ धावांची खेळी करत सौराष्ट्रला ३०० पार मजल मारून दिली. तर चेतन सकारियाने नाबाद २८ धावा केल्या. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. पण तरीदेखील त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.