सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. फिरकीपटू आदित्य सरवटेने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात सौराष्ट्राच्या 6 फलंदाजांना माघारी धाडत आदित्यने सौराष्ट्राच्या डावाला खिंडार पाडलं. या कामगिरीसह आदित्यने दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही डावांमध्ये 5 बळी घेणारा आदित्य सरवटे सहावा गोलंदाज ठरला आहे. याआधी जे. बी. खोत (1941-42), सी.एस. नायुडू (1942-43, 1944-45, 1945-46), पद्माकर शिवलकर (1972-73), ए. एम. इस्माईल (1975-76), बी. एस. चंद्रशेखर (1977-78) यांनी अशी कामगिरी केली आहे. यानंतर तब्बल 41 वर्षांनी आदित्यने अशी कामगिरी केली आहे.  आदित्यने दोन्ही डावात सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. या विजयानंतर विदर्भासमोर इराणी चषकाचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – रणजी करंडक : वासिम भाईंचा ‘दस का दम’