X

Video: क्वारंटाइन धमाल… अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत भन्नाट डान्स

अजिंक्यची पत्नी राधिकाने पोस्ट केला व्हिडीओ

करोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. २६ जानेवारीला रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर हे तीन मुंबईकर चेन्नईत दाखल झाले. आता पुढील ६ दिवस ते क्वारंटाइन असणार आहे.

अजिंक्य रहाणे चेन्नईला सहकुटुंब रवाना झाला आहे. चेन्नईच्या हॉटेल रूममध्ये अजिंक्य आपली पत्नी राधिका आणि मुलगी आर्या हिच्यासोबत क्वारंटाइन झाला आहे. या क्वारंटाइन कालावधीत अजिंक्य आपल्या मुलीसोबत झकास वेळ घालवत आहे. गेली अडीच महिने अजिंक्य ऑस्ट्रेलियात होता. त्यामुळे आता तो शक्य तितका वेळ आपल्या कुटुंबासोबत आणि विशेषत: मुलीसोबत घालवत आहे. अजिंक्य आणि त्याच्या मुलीचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अजिंक्यने पत्नी राधिका धोपावकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, इंग्लंडचा संघदेखील भारतात दाखल झाला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी न गेलेले इंग्लंडचे जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रॉरी बर्न्स हे आधीच भारतात दाखल झाले होते. त्यांचा क्वारंटाइन कालावधीदेखील सुरू झाला. पण श्रीलंकेला गेलेला इंग्लंडचा संघ बुधवारी भारतात दाखल झाला. चेन्नईच्या विमानतळावर सकाळी इंग्लंडचा संघ दाखल झाला. खेळाडू आणि सहाय्यक या साऱ्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘बायो-बबल’मध्ये प्रवेश केला. इंग्लंडचा संघ ६ दिवस क्वारंटाइन असणार आहे. त्यानंतर केवळ तीन दिवस सराव केल्यानंतर त्यांना भारताविरूद्ध मैदानात उतरावे लागणार आहे.

20
READ IN APP
X