अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनाही शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच इंग्लंडने सामना खिशात घातला. इंग्लंडने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ २६३ धावांत संपुष्टात आला.

Ashes 2019 ही मालिका स्मिथने गाजवली. त्याने ७ डावात मिळून एकूण ७७४ धावांचा रतीब घातला. त्याने तब्बल ७ पैकी ६ वेळा ८० धावांहून अधिक धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. पण अखेर मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडने स्मिथला बरोबर अडकवले. सहसा फलंदाजांच्या मागे ३० यार्डाच्या वर्तुळात फिल्डर ठेवला जात नाही. पण स्मिथची खेळण्याची पद्धत लक्षात घेता स्टुअर्ट ब्रॉडने एक फिल्डर त्या जागी ठेवला आणि स्टीव्ह स्मिथ अगदी सहज त्या जाळ्यात अडकला.

चौथ्या दिवशी चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर ब्रॉड आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजून योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रलियाचा चौथ्या दिवशीच पराभव झाला. ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान होते. पण ब्रॉडच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. संपूर्ण मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक बळी टिपले.