क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सामन्याचा शेवटचा चेंडू जोवर टाकला जात नाही, तोवर सामन्याचा निकाल काय लागेल? हे सांगता येत नाही. तसेच हल्ली बदलत्या क्रिकेटच्या नियमांमुळे अनेकदा अजब प्रकारचे झेल किंवा धावबाद झाल्याचेही पाहायला मिळते. महिला क्रिकेटमधील असाच एक अजब प्रकारचा झेल सध्या व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यात ही गोष्ट घडली. या सामन्यात न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावांवर फलंदाजी करत होती. तिने हिथर ग्रॅहम हिच्या गोलंदाजीवर सरळ फटका खेळला. हा चेंडू थेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिनच्या बॅटवर आदळला आणि चेंडू उडाला. त्यानंतर तो चेंडूला गोलंदाज ग्रॅहमने झेलला आणि झेलबाद झाल्याचे अपील केले.

मैदानावरील पंचांनाही आता नक्की काय करावे? हे उमगले नाही. अखेर त्यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. घटना नीट पाहून आणि त्याचा अभ्यास करून तिसऱ्या पंचांनी लगेचच पेरकिन्सला बाद ठरवले. दरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हा प्रकार खिलाडूवृत्तीने स्वीकारला याबाबत पंचांनीही त्यांचे कौतुक केले.