भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असं फार क्वचित घडतं. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे. पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसं उत्तर द्यायला सुरूवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये मैदानावर बाचाबाची होणं हे अगदी स्वाभाविकच झालं आहे. पण आज कसोटीच्या चौथ्या दिवशी मात्र मैदानात चांगलाच राडा झाल्याचं दिसलं.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतरदेखील चौथ्या दिवशी सिडनीच्या मैदानातील काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्याने सुरू असलेला खेळ थांबवण्याची वेळ आली.

सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी काही चाहते त्याच्याबाबत आक्षेपार्ह शब्द बोलले. हे पाहून त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केलं, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही, हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता.

मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी सिराजच्या तक्रारीनंतर तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसल्याने साऱ्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं.