Video : विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या तुफानी फलंदाजीसाठी आणि टी२० क्रिकेटमधील आपल्या विक्रमांसाठी कायम चर्चेत असतो. पण नुकतेच त्याने आपल्या क्षेत्ररक्षणामुळे सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्लोबल कॅनडा लीगमध्ये अंतिम सामन्यात व्हॅन्कुव्हर नाईट्स या संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज बी संघाविरुद्ध पहिल्या स्लिपमध्ये त्याने झेल घेतला. त्याने एका हाताने पकडलेल्या या झेलमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा झेल घेऊन त्याने कावेम हॉज याला तंबूत परत पाठवले.

फवाद अहमद याच्या गोलंदाजीवर हॉजने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बॅटच्या कडेला लागून चेंडू स्लिपमध्ये गेला. गेल स्लिपमध्ये उभा होता. सुरुवातीला गेलला चेंडू कोणत्या दिशेने जाणार, हे कळलेच नाही. पण जसा चेंडू जवळ आला, तसा त्याने पटकन झेल टिपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला लागून चेंडू उडला आणि त्याच्यापासून थोडा दूर गेला. पण तरीही गेलने पटकन चेंडूपर्यंत हात नेत झेल टिपला.

हा सामना व्हॅन्कुव्हर नाईट्स संघाने ७ गडी राखून जिंकला आणि स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिज बी संघाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १४५ धावा केल्या होत्या. हे आव्हान व्हॅन्कुव्हर नाईट्सच्या संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.