भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिपण्णीचा सामना करावा लागला. याबद्दलची अधिकृत तक्रार केल्यानंतर सहा प्रेक्षकांची स्टेडियमबाहेर हकालपट्टी करण्यात आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेदेखील टीम इंडियाची जाहीर माफी मागितली. याच सामन्यात ऑस्ट्रेलियन समालोचकावरही माफी मागण्याची वेळी आली. समालोचन कक्षात बसलेला असताना ऑस्ट्रेलियन समालोचक जेम्स ब्रेशॉ याला माजी फलंदाज सुनील गावसकर यांची माफी मागावी लागली.

भारतीय संघाच्या पहिल्या डावातील फलंदाजीच्या वेळी हा प्रकार घडला. रविंद्र जाडेजा आणि नवदीप सैनी फलंदाजीसाठी मैदानात हजर होते. त्यावेळी समालोचन करणारे ब्रेशॉ सामन्याबद्दलची माहिती देत होते. तेवढ्यात समालोचन कक्षात बदल झाला आणि दोन नवीन समालोचक कक्षात आले. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डॅमियन फ्लेमिंग आणि भारतीय माजी कर्णधार सुनील गावसकर दोघेही आतमध्ये येताच ब्रेशॉ यांनी त्या दोघांचं स्वागत केलं. पण त्यात ब्रेशॉ यांनी सुनील गावसकरांबद्दल एक चूक केली. त्यामुळे त्यांच्यावर गावसकरांची माफी मागण्याची वेळ आली.

पाहा व्हिडीओ-

ब्रेशॉ स्वागत करताना म्हणाले, “डॅमियन फ्लेमिंग आणि सचिन तेंडुलकर यांचं समालोचन कक्षात स्वागत…” असं म्हणताच डॅमियन फ्लेमिंगने ब्रेशॉ यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. सुनील गावसकर यांचा उल्लेख सचिन असा केल्याने ब्रेशॉ काहीसे ओशाळले आणि त्यांनी लगेच सुनील गावसकर यांची माफी मागितली. सचिनबद्दल आम्ही आता चर्चा करत होतो त्यामुळे माझ्याकडून ही चूक घडली असं स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिलं.