सध्या बांगलादेशमध्ये बांगबंधू टी२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तब्बल २० चुरशीच्या सामन्यानंतर या स्पर्धेतील पाच संघांपैकी अव्वल चार संघ पुढील फेरीत गेले आहेत. या स्पर्धेतील बाद फेरीचा सामना सोमवारी खेळवण्यात आला. पहिल्या एलिमिनेटर सामन्या बेक्सिमो ढाका आणि फॉर्च्यून बरीसाल हे दोन संघ आमने सामने होते. मुश्फीकूर रहीमच्या नेतृत्वाखाली ढाका संघाने ९ धावांनी सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.

सामन्यात ढाका संघाने २० षटकांत १५० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना १७व्या षटकात एक विचित्र प्रकार घडला. बरीसाल संघाला १९ चेंडूत विजयासाठी ४५ धावांची आवश्यकता होती. शफीऊल इस्लाम गोलंदाजी करत होता. अर्धशतकी खेळी करून खेळपट्टीवर स्थिरावलेला असिफ समोर फलंदाजी करत होता. शफिऊलने टाकलेला चेंडू असिफच्या बॅटच्या कडेला लागला. त्यामुळे चेंडू उंच उडाला. विकेट किपर मुश्फीकूर आणि स्लिपमध्ये उभा असलेला फिल्डर नसुम अहमद दोघेही झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. त्याचदरम्यान या दोघांची टक्कर झाली. मुश्फीकूरने झेल टिपला पण त्यानंतर त्याने भरमैदानात चक्क नसुमवर हात उगारला. इतर सहकाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मुश्फीकूर नसुमवर आणखी काही ओरडतच होता.

घडलेला प्रकार नेटिझन्सच्या पचनी पडला नाही. क्रिकेटसारख्या सभ्य लोकांच्या खेळात अशाप्रकारची वर्तणूक करणं योग्य नसल्याचं अनेक क्रिकेटरसिकांचं मत दिसलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाचे नेतृत्व केलेल्या मुश्फीकूरकडून अशाप्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नसल्याचे अनेक ट्विट या घटनेनंतर नेटिझन्सकडून करण्यात आले.