भारताच्या महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले. वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार तिला जाहीर करण्यात आला. यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. या बरोबर स्मृती एकाच वर्षात दोन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. या पुरस्कारानंतर आता फक्त विश्वचषक जिंकणं हेच आपलं ध्येय असल्याचे तिने सांगितले.

याबाबत बोलताना स्मृतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की एकाच वेळी २ पुरस्कार मिळणे ही खूप गौरवाची बाब आहे. जेव्हा आपण चांगला खेळ करतो तेव्हा आपला संघ जिंकावा एवढीच इच्छा असते. त्यात आपल्या चांगल्या कामगिरीची जेव्हा पावती मिळते, तेव्हा आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

 

दक्षिण आफ्रिकेतील माझे शतक मला शतक खास वाटले. अनेकांनी माझ्यावर भारतातील कामगिरीवरून टीका केली, पण यंदा मी मायदेशातही चांगली कामगिरी केली. टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी वगळता आम्ही उल्लेखनीय कामगिरी केली. पण विश्वचषक आम्हाला जिंकता आला नाही, त्यामुळे आता लक्ष्य एकच ते म्हणजे विश्वचषक, अशी इच्छा तिने व्यक्त केली.

दरम्यान, स्मृतीला २०१८च्या ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.