ऑस्ट्रेलियाला १५१ धावांवर बाद करून भारताने पहिल्या डावात २९२ धावांची मोठी आघाडी घेतली. भारतीय संघाने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावले.

उपहाराच्या विश्रांतीआधी ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ८९ झाली होती. त्यापैकी २ गडी बुमराहने बाद केले होते. जसप्रीत बुमराने कांगारूंना सळो की पळो करून सोडले होते. उपहारानंतरही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा सुरूच ठेवला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरला.

 

उपहाराला जाण्यापूर्वी अखेरच्या चेंडूवर बुमराने शॉन मार्शला यॉर्कर टाकला आणि त्यावर तो पायचीत होऊन माघारी परतला. मुख्य म्हणजे हा चेंडू वेगाने येईल अशी मार्शची अपेक्षा होती, पण बुमराहने स्मार्ट गोलंदाजी करत त्याला बाद केले.

बुमराहाने हॅरीस, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, टिम पेन, लिऑन आणि हेजलवूड यांना बाद केले. बुमराहने १५.५ षटकांमध्ये ३३ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.