वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडला १७६ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. हे आव्हान त्यांनी १५.२ षटकांत पूर्ण केले. त्याआधी कर्णधार कायरन पोलार्डच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने १८० धावांपर्यंत मजल मारली.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची अवस्था बिनबाद ५८ वरून ५९ / ५ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार कायरन पोलार्ड याने तुफान फटकेबाजी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने ३७ चेंडूमध्ये २००पेक्षाही अधिकच्या स्ट्राईक रेटने ७५ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे त्याने तब्बल ८ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या बेधडक खेळीमुळेच वेस्ट इंडिजने १८० धावांपर्यंत मजल मारली.

१८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार १६ षटकात १७६ धावांचे आव्हान देण्यात आले. हे आव्हान न्यूझीलंडने १५.२ षटकात पूर्ण केले. डीवॉन कॉनवे (४१) आणि ग्लेन फिलीप (२२) यांची चांगली झुंज दिली. पण जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. नीशमने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. तर सँटनरने ३ षटकारांसह १८ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या.