क्रिकेटचा ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा याने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मलिंगाच्या यॉर्करपुढे भल्याभल्या फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. पण २०२० साली होणारा टी २० विश्वचषक लक्षात घेता फिट असूनही त्याने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये मलिंगाची गोलंदाजी पाहता येणार नाही याची खंत चाहत्यांनी आहे. पण तशातच सध्या एका ‘ज्युनिअर मलिंगा’चा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हा हुबेहुब मलिंगासारखीच गोलंदाजी करतो आहे. मथीशा पथीराना असं या १७ वर्षाच्या गोलंदाजाचे नाव असून श्रीलंकेतील ट्रिनिटी कॉलेजचा विद्यार्थी आहे. तो खेळत असलेल्या एका स्थानिक सामन्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्या ‘ज्युनिअर मलिंगा’ने ७ धावा देत ६ बळी टिपले आहेत.

पहा व्हिडीओ –

हा व्हिडिओ पाहून क्रिकेट रसिकाला मलिंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्या व्हिडीओमध्ये मथीशाने घेतलेले बळी दिसत आहेत. त्याने टाकलेले यॉर्कर हुबेहुब मलिंगाने टाकलेल्या यॉर्करसारखे आहेत. त्यामुळे या व्हिडीओतील गोलंदाजाची स्तुती केली जात आहे.

दरम्यान, २०१० मध्ये मलिंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर २०१९ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.