IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये आहे. मात्र मर्यादित ठिकाणी सराव करण्यास खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेतल्यावर सर्व खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरल्याचे दिसून आले. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गोलंदाजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या चेतेश्वर पुजारा तगडा सराव केला.

२०१८-१९मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियात यजमानांना कसोटी मालिकेत धूळ चारणारा भारत हा आशिया खंडातील पहिलाच देश ठरला. ४ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. या मालिकेत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अक्षरश: धुलाई केली. त्याने ४ सामन्यांतील ७ डावात एकूण ५२१ धावा कुटल्या. यात ३ शतकं आणि १ अर्धशतकाचा समावेश होता. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक ५० चौकारही पुजाराच्या बॅटमधून निघाले. त्या मालिकेचा हिरो ठरलेल्या पुजाराचा एक व्हिडीओ BCCIने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पुजारा जोरदार सराव करताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, प्रत्येक मालिकेच्या पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेनने सांगितलं आहे. “जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल”, असे टीम पेनने स्पष्ट केलं