23 January 2021

News Flash

Video : अदानींना पाच हजार कोटींचं कर्ज देऊ नका ; सिडनीच्या मैदानात घुसखोरी करत SBI कडे केली मागणी

पाहा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान नक्की काय घडलं यासंदर्भातील व्हिडीओ

(फोटो Twitter/stopadani वरुन साभार)

लॉकडाउनपश्चात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून सिडनीच्या मैदानावर दोन्ही संघ पहिल्या वन-डे सामन्यासाठी मैदानात उतरले आहेत. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौरा आटोपून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेली नाही. त्यामुळेच हा सामना पाहण्यासाठी सिडनीच्या मैदानावर क्रिकेट चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे. मात्र या सामान्यादरम्यान अदानीविरोधातील आंदोलकांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

नक्की पाहा >> फोटो : काय आहे हे प्रकरण आणि कशाप्रकारे झालं हे आंदोलन

सिडनीच्या मैदानावरील सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सहा षटकांचा खेळ झाल्यानंतर मैदानामध्ये दोन आंदोलक दाखल झाले. हे दोघेही थेट मैदानात पिचजवळ धावत गेले. या आदोलकांच्या हातात अदानी उद्योग समुहाला विरोध करणारा, ‘NO $1B ADANI LOAN’ म्हणजेच अदानींना एक बिलियन डॉलरचं कर्ज (पाच हजार कोटी रुपये) नको अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला बॅनर होता. हे आंदोलक मैदानामध्ये दाखल झाल्याचे सुरक्षा रक्षकांना समजेपर्यंत काही वेळ गेला.  मात्र आंदोलक मैदानात प्रवेश केल्याचे समजताच त्यांना बाहेर काढण्यात आलं.

या व्यक्तींच्या टीशर्टवर ‘अदानींना थांबवा’ असा हॅशटॅग होता. तर मागील बाजूस, “कोळसा थांबवा, अदानी थांबवा कारवाई करा,” असा मजकूर होता. मालिकेतील पहिल्याच सामन्यात घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बायो बबल आणि इतर उपाय योजनांच्या माध्यमातून खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असतानाच दुसरीकडे अशाप्रकारे एखादी व्यक्ती मैदानात शिरकाव करुन खेळाडूंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं धोकादायक आहे.  मात्र या व्यक्तींमुळे खेळाडूंना बायो बबलच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या सुरक्षेला कोणताही धोका पोहचलेला नाही असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे. या व्यक्ती कोणत्याही खेळाडूच्या खूप जवळ गेली नाही त्यामुळे सर्व सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

शुक्रवारी अदानी समुहाविरोधात काम करणाऱ्या स्टॉप अदानी या संस्थेने एक पत्रक जारी करुन स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानींना एक बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं कर्ज देऊ नये अशी मागणी केली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियातील पर्यावरण संवर्धकांनी अदानी समुहाच्या कोळसा खाणींना विरोध केला होता. मात्र या न्यायालयीन वादात अदानी समुहाच्या बाजूने निकाल लागला. अदानी समुहाने या प्रकल्पामुळे क्विन्सलॅण्डमधील दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळाल्याचा दावा केला आहे. मैदानाबाहेरही मोठ्याप्रमाण आंदोलक जमा झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:35 pm

Web Title: video of two stop adani supporters taking the grounds to protest sbi plans to give adani 5000 crore loan scsg 91
Next Stories
1 म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात…
2 फिंचचं दमदार अर्धशतक; आरसीबीच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
3 वडिलांच्या मृत्यूचा संदर्भ देताना चुकला गिलख्रिस्ट, सोशल मीडियावर चाहते खवळले
Just Now!
X