अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने केलेलं दणक्यात पुनरागमन खास ठरले. त्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्मानेही आपला क्वारंटाइन कालावधी संपवत संघात दाखल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला. ‘हिटमॅन’ने सुपर एन्ट्री घेत टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांची आणि इतर सदस्यांची गळाभेट घेतली.

बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अजिंक्यसेना एका मोठ्या हॉलमध्ये जेवणाचा आनंद लुटत असताना रोहित शर्मा तिथे दाखल झाला. क्वारंटाइन संपवून तो संघाला भेटला. त्याच्या एन्ट्रीनंतर संघातील साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू दिसून आलं. रोहितने सर्वप्रथम संघातील खेळाडूंची गळाभेट घेतली. त्यांच्यासोबत गप्पादेखील मारल्या. प्रशिक्षक रवी शास्त्रींशी क्वारंटाइनचा अनुभव शेअर करतानाचा संवादही हा व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. सध्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि इतर सदस्यांनी रोहितचं दणक्यात स्वागत केलं.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, तिसऱ्या कसोटीत रोहित संघात असेल की नसेल याबाबत अद्याप अधिकृत सांगण्यात आलेले नाही. “रोहित भारतीय संघात दाखल झालाय. पण शारीरिकदृष्ट्या तो किती तंदुरुस्त आहे याची आम्ही आधी तपासणी करू. तो प्रदीर्घ काळ क्वारंटाइन होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत तो सहभागी होईल की नाही याचा निर्णय घेण्याआधी त्याला नेमकं कसं वाटतंय याचाही विचार करावा लागणार आहे”, अशी माहिती रवी शास्त्री यांनी दिली.