भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कायम विविध विषयांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावर सचिन खूपच अ‍ॅक्टीव्ह असल्याचे दिसून आले आहे. आधी बाद की नाबाद या व्हिडीओमुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. नंतर एका संगीतकाराशी घेतलेल्या भेटीमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत होता. आता मात्र तो एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आहे.

सचिन तेंडुलकरने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्याने झकासपैकी कार पार्क करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. पण महत्वाचे म्हणजे कारमध्ये सचिन ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता. आणि कारच्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीही बसलेला नसताना गाडी पार्क झाल्याचे त्याने व्हिडिओमध्ये दाखवले. माझी गाडी ‘Mr. India’ चालवत असल्याचा भास होत असल्याचे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

या व्हिडिओमध्ये तेंडुलकर ज्या कारमध्ये बसला आहे, ती कार चालकाविना चालणारी आहे. ही कार स्वयंचलित आहे. तेंडुलकरने प्रथमच हा अनुभव घेतला आहे आणि त्यानं घराच्या पार्किंगमध्ये या स्वयंचलित कारने फेरफटका मारला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारित ‘८००’ या चरित्रपटात सचिन तेंडुलकर झळकणार आहे.