भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला. पहिल्या डावांत मिळालेल्या ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयसाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. स्टीव्ह स्मिथचं अर्धशतक (५५) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशेनजीक मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. शार्दुलने ४ तर सिराजने ५ बळी टिपले. या सामन्यात शार्दुलच्या एका कृतीमुळे प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मोहम्मद सिराजने ७३ धावांत ५ बळी मिळवले. तर शार्दुल ठाकूरने ६१ धावांत ४ बळी मिळवले. दोघेही चार-चार बळी मिळवून गोलंदाजी करत असताना केवळ ऑस्ट्रेलियाचा एकच गडी शिल्लक होता. त्यावेळी सिराजच्या गोलंदाजीवर शार्दुलने त्याचा झेल टिपला. इतकेच नव्हे तर जेव्हा सिराजने पाच गडी मिळवल्यानंतर त्याचा उदो उदो केला जात होता, तेव्हाही शार्दुल मुक्तहस्ताने टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरदेखील हास्य होतं. हा प्रकार पाहिल्यावर सर्व भारतीय चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याची भावना सोशल मीडियावर दिसून आली.

दरम्यान, सिराजने मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड असे पाच बळी त्याने टिपले. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा गडी हेजलवूड बाद झाल्यावर सारे जण पॅव्हेलियनकडे जाऊ लागले. त्यावेळी कर्णधार रहाणेने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: पंचांशी संवाद साधला. सिराजने प्रथमच एका डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्यामुळे अजिंक्यने तो चेंडू पंचांकडून मागून सिराजला दिला. अजिंक्यच्या या कृतीची सर्वत्र स्तुती करण्यात आली.