पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या ड्राफ्ट इव्हेंटसाठी शोएबने हजेरी लावली होती. या कार्यक्रमावरून घरी परतत असताना त्याच्या कारची एका मोठ्या वाहनाला धडक बसली आणि अपघात झाला.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याच्या कारला लाहोर येथे अपघात झाला. पीएसएलच्या सहाव्या हंगामासाठी ड्राफ्ट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. शोएबला पेशावर जल्मी संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. या इव्हेंटनंतर शोएब त्याची आलिशान स्पोर्ट्स कार घेऊन निघाला. परंतु लाहोरच्या रस्त्यावर त्याच्या स्पोर्ट्स कारची एका ट्रकला धडक बसली. सुदैवाने शोएब मलिकला फारशी इजा झाली नाही, पण स्पोर्ट्स कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की शोएब मलिकचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली स्पोर्ट्स कार थेट जाऊन समोरच्या ट्रकवर आदळली. एका हॉटेलबाहेर ट्रक पार्क करण्यात आला होता. त्या ट्रकला कारने धडक दिली. समा टीव्हीच्या माहितीनुसार, आपला सहकारी वहाब रियाज याच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना शोएबचा कारवरील ताबा सुटला. मलिकने कारचा अपघात होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केला पण कारवर ताबा न राहिल्याने अखेर गाडी ट्रकवर आदळली. कारचा चुराडा झाला असला तरी मलिक सुदैवाने सुखरूप असल्याची माहिती आहे.

“मी साऱ्यांना सांगू इच्छितो की मी सुखरूप आहे. माझ्या कारला अपघात झाला असला तरी त्यात मला दुखापत झालेली नाही. देवानेच मला यातून वाचवलं. माझ्या तब्येतीची चौकशी करणाऱ्या साऱ्यांना धन्यवाद. तुमचं माझ्यावरील प्रेम आणि काळजी पाहून मला आनंद झाला”, असं ट्विट करत मलिकने आपण सुखरूप असल्याचं सांगितलं.