गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंमध्ये तंदुरुस्ती (फिटनेस) बाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम क्रीडाविश्वात दिसून येत आहे. क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाच्या दर्जात देखील सुधारणा झाली आहे. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते महेंद्रसिंग धोनीचं… धोनीने यष्टीरक्षणामध्ये नव्या पद्धती रुजवल्या. त्याने फलंदाज यष्टिचीत करण्यासाठी नव्या पद्धती दाखवून दिल्या. केवळ नवखे यष्टीरक्षकच नव्हे, तर अनुभवी यष्टीरक्षकदेखील धोनीच्या या नव्या पद्धतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार टी २० ब्लास्ट या स्पर्धेत घडला.

हॅम्पशायर संघाचा यष्टीरक्षक लुईस मॅकमनस याने ससेक्सचा फलंदाज लॉरी इव्हॅन्स याला धोनी-स्टाईल यष्टिचीत केले. सध्या सुरु असलेल्या T20 Blast या स्पर्धेत बुधवारी हॅम्पशायर आणि ससेक्स या २ संघांमध्ये सामना रंगला. या दरम्यान पहिल्या डावाच्या १० व्या षटकात हा प्रकार घडला. लेग स्पिनर मसन क्रेन याच्या गोलंदाजीवर लॉरी इव्हॅन्स यष्टिचीत झाला.

गोलंदाज मसन क्रेन याने टाकलेला चेंडू लेग स्पिन झाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उडला. फलंदाजदेखील चेंडू खेळताना थोडासा गांगरला. त्याने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला न लागत थेट यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टिरक्षकाकडे चेंडू जाताच त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला चेंडू पकडण्यात यश आले, पण ही बाब फलंदाजाच्या लक्षात आले नाही. तो क्रीजच्या बाहेर जाऊ लागला, तेवढ्यात यष्टिरक्षकाने चेंडू स्टंपला लावला आणि त्याला बाद केले.

यष्टीरक्षकाने चेंडू स्टंपला लावल्यानंतर फलंदाजाने याबाबत पंचांकडे दाद मागितली, पण पंचांनी नियमानुसार त्याला बाद ठरवले.