पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावातदेखील दमदार खेळ केला. चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात लाबूशेन आणि स्मिथ जोडीने आपली अर्धशतकं पूर्ण केली. त्यानंतर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण दुर्दैवाने दोघांनाही आपलं शतक पूर्ण करता आलं नाही. लाबूशेन ७३ धावांवर झेलबाद झाला, तर स्मिथ ८१ धावांवर पायचीत झाला. स्मिथची विकेट महत्त्वाची असली, तरी चर्चा मात्र लाबूशेनच्या विकेटची रंगली.

नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर लेग साईडला जाणाऱ्या चेंडूला लाबूशेनने टोलवण्याचा प्रयत्न केला. चेंडू लाबूशेनच्या ग्लोव्ह्ज ला लागला आणि चेंडूचा मार्ग थोडा बदलला गेला. तेव्हा वृद्धिमान साहाने सुपरमॅनसारखी उडी घेत चेंडू झेलला आणि लाबूशेनला माघारी धाडलं. लाबूशेनने ११८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. ९ चौकारांचा समावेश होता. वृद्धिमान साहाने टिपलेला अप्रतिम झेल पाहून नेटीझन्सने त्याची स्तुती केली.

दरम्यान, लाबूशेननंतर काही वेळातच स्टीव्ह स्मिथदेखील बाद झाला. त्याने १६७ चेंडूत ८१ धावा केल्या. स्मिथच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. अश्विनच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला.

——–