युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत टी २० स्पर्धेत आणि इतर टी २० लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने GT20 Canada या स्पर्धेतून पुनरागमन केले. पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद नसतानाच तो माघारी परतला.

टोरँटो नॅशनल्स या संघाकडून तो GT20 Canada या स्पर्धेत खेळत आहे. तो संघाचा कर्णधार आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना टोरँटो नॅशनल्स आणि व्हॅन्कुव्हर नाईट्स यांच्यात झाला. या सामन्यात युवराजच्या फटकेबाजीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा तो अत्यंत संथपणे खेळू लागला. क्रिकेटच्या मैदानातील सराव नसल्याने त्याला फारशी चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. पण त्यापेक्षा चर्चेचा विषय ठरला तो युवराजच्या बाद होण्याची पद्धत… गोलंदाजाने टाकलेला चेंडू युवराजच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला होता, पण त्याने तो झेल पकडला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या अंगावर आदळला आणि त्यानंतर स्टंपवर पडला. युवराज थोडा पुढे सर्कल होता त्यामुळे आपण बाद झालो असे मानून त्याने तंबूचा रस्ता धरला. पण नंतर तो बाद नसल्याचे दिसून आले.

सामन्यात युवराजने २७ चेंडू खेळून १४ धावा केल्या. त्याला स्क्वेअर लेग पंचांनी बाद ठरवले. पंचांनी बाद ठरवल्यानंतर तो माघारी परतला. रिप्ले तपासून पाहण्याच्या आधीच तो तंबूत पोहोचला होता. युवराजने या स्पर्धेत खेळण्यासाठी BCCI ची परवानगी मागितली होती. ही परवागनी मिळाल्यानंतर तो या स्पर्धेत खेळत आहे.