२०१३पासून बुद्धिबळपटूला अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही. ऑलिम्पियाड विजेतेपदामुळे किमान आता तरी विदितसह इतर खेळाडूंचा या पुरस्कारांसाठी विचार होऊ शकेल, अशी आशा भारताचा कर्णधार विदित गुजराथीचे  वडील संतोष गुजराथी यांनी व्यक्त केली.

नाशिकच्या विदितच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच रशियासह संयुक्त जेतेपद मिळविल्याबाबत शहराच्या क्रीडा क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. विदितचे वडील संतोष गुजराथी यांनी या विजेतेपदासाठी संघातील सर्वच खेळाडू कित्येक दिवसांपासून तयारी करत होते, असे सांगितले.

‘‘काही तांत्रिक गोष्टींमुळे विजेतेपद संयुक्त झाले असले तरी रशियानेही उत्कृष्ट खेळ केला. कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. एवढी चुरस झाली. त्यामुळे दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद मिळणे हा योग्य निकाल ठरला. सामना सुरू असताना ऐनवेळी व्यूहरचना बदलण्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे असते,’’ असे त्यांनी सांगितले.

नाशिककरांसाठी दुग्धशर्करा योग!

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी विदितने पुन्हा एकदा नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आणली. नाशिकमध्ये  काही वर्षांपासून बुद्धिबळ चांगला फोफावत असून या यशाबद्दल विदितचा क्रीडा कार्यालयातर्फे लवकरच सन्मान करण्यात येईल, असे सांगितले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कारानंतर लगेच विदितच्या नेतृत्वाखाली बुद्धिबळमध्ये जगज्जेतेपद मिळणे, हा नाशिककरांसाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल, असे सांगितले. विदित हा मविप्र संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याने आनंद अधिकच असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा खो-खो संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख यांनी सरकारने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारापासून कायमच बुद्धिबळला डावलले असून विदितची कामगिरी नक्कीच पुरस्कारयोग्य असल्याचे नमूद केले.