बाएन बुद्धिबळ स्पर्धा

भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.

अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेऱ्या, जलद बुद्धिबळाच्या सात फेऱ्या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या १४ फेऱ्या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणाऱ्याला तीन गुण, जलद प्रकारात दोन आणि ब्लिट्झसाठी एक गुण असे एकूण ४९ गुण मिळवण्याची संधी होती. विदितने क्लासिकल प्रकाराची एक फेरी शिल्लक राखून ३१ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेच्या सॅम्युएल शांखलँडपेक्षा तो चार गुणांनी आघाडीवर आहे.

विदितने ब्लिट्झ प्रकारात १४ पैकी ११ गुणांची कमाई करत अप्रतिम सुरुवात केली होती. त्यानंतर जलद प्रकारात त्याने ८ गुण पटकावले होते.

त्यानंतर क्लासिकल प्रकारात जॉर्ज कोरी, पीटर लेको आणि सेबॅस्टियन बोंगेर यांच्यावर विजय मिळवत शांखलँड, निको जॉर्जियाडिस आणि नोडिरबेक अब्दुसात्तोरोव्ह यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या होत्या. आता अंतिम फेरीत विदितचा सामना जागतिक विजेत्या परहाम माघसोडलो याच्याशी होईल.

कोणत्याही स्पर्धेतील विजेतेपद हे माझ्यासाठी खास असते. कडव्या प्रतिस्पध्र्याचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे. क्लासिकल प्रकारात मी अपराजित राहिलो. माझ्या शैलीनुसार मी खेळात अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून मी खेळात अधिक धोका पत्करत आहे. या रणनीतीचे मला फळ मिळाले.

– विदित गुजराथी