आयबीएल स्पर्धा ही बॅडमिंटनमधील नवीनच संकल्पना असल्यामुळे त्याच्यावर टीका करण्याऐवजी सकारात्मक वृत्तीने पाहिले, तर त्यामधील सामन्यांचा खरा आनंद घेता येईल असे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट हिने ‘लोकसत्ता’ स सांगितले.
आयबीएल स्पर्धेतील लढतींना बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील मुंबई मास्टर्स या संघाच्या सल्लागारपदी अपर्णा हिची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या अपर्णाने महाराष्ट्र बॅडमिंटन लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
या स्पर्धेत अवघ्या अठरा दिवसांच्या कालावधीत जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हे लक्षात घेता या स्पर्धेकडे खेळाडूंनी, संघटकांनी व प्रेक्षकांनी सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे. कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात करताना अडचणी येतातच मात्र ही स्पर्धा देशातील बॅडमिंटन क्षेत्रातील क्रांतिकारक स्पर्धा आहे असे लक्षात घेत त्यामधील सामन्यांचा आनंद घ्यावा असे अपर्णाने सांगितले.
भारतामधील अव्वल दर्जाच्या जोडय़ांमधील खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. त्याबाबत विचारले असता अपर्णा म्हणाली, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, प्रज्ञा गद्रे आदी दुहेरीतील खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून वेगवेगळ्या साथीदारासह खेळणार आहेत. हीच स्पर्धेची खरी मजा आहे. या खेळाडूंना अन्य खेळाडूच्या साथीने खेळताना आपले कौशल्य पणास लावावे लागणार आहे. जर नेहमीच्या जोडय़ा एकाच संघाकडून खेळल्या असत्या, तर त्यामध्ये नावीन्य दिसले नसते. वेगवेगळ्या जोडीत खेळताना पाहताना लोकांनाही खूप चांगले वाटेल. खेळाडूंनाही त्यामधून बरेच काही शिकावयास मिळणार आहे. आपण या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असे मलाही वाटत आहे.  
  या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना योग्य स्थान मिळाले नाही अशी टीका होत आहे. त्याबाबत अपर्णा म्हणाली, ही स्पर्धा कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नाही. जागतिक स्तरावर ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे राज्यांपेक्षाही देशातील मानांकित खेळाडूंना जास्त महत्त्व देण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशांमधील खेळाडू एकत्रित येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होणार आहे. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेद्वारे बरेच काही शिकावयास मिळणार आहे. परदेशी खेळाडूंची शैली, पदलालित्य, सराव, शारीरिक तंदुरुस्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास आपल्या खेळाडूंनी केला पाहिजे.
या स्पर्धेचा भारताच्या बॅडमिंटन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होणार आहे. या निमित्ताने भारतीय खेळाडूंना अल्प काळात भरघोस कमाई करता येणार आहे. तसेच या स्पर्धेमुळे खेळाचा प्रसार अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि पर्यायाने अधिकाधिक पुरस्कर्तेही या खेळाकडे खेचले जाणार आहेत असेही अपर्णाने सांगितले.