भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना

ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धचा सराव सामना अनिर्णित

भारतीय कसोटी संघातील स्तंभ अशी ओळख असलेला मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सूर गवसल्याने संपूर्ण संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धच्या सराव सामन्यातील अखेरच्या दिवशी विजयने सुरेख शतक झळकावले, तर राहुलनेही अर्धशतकी योगदान दिल्याने भारताने हा सामना अनिर्णित राखला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या विजयने १६ चौकार व पाच षटकारांसह १३२ चेंडूंत १२९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मुख्य म्हणजे ९१ चेंडूंत अर्धशतक करणाऱ्या विजयने पुढील २७ चेंडूंत शतकाला गवसणी घातली. राहुलनेही आठ चौकार व एका षटकारासह ६२ धावा करत विजयसह १०९ धावांची सलामी भागीदारी रचली. राहुल बाद झाल्यावर हनुमा विहारीसह विजयने दुसऱ्या गडय़ासाठी १०२ धावा जोडल्या. अखेरीस विजय १२९ धावांवर बाद झाल्यावर पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. विहारी १५ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात भारताने २ बाद २११ धावा केल्या.

त्यापूर्वी शुक्रवारच्या ६ बाद ३५६ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५४४ धावांपर्यंत मजल मारली. यष्टीरक्षक हॅरी नेल्सनने १०० धावा केल्या, तर आरोन हार्जीने ८६ धावा कुटल्या. त्याशिवाय तळाच्या तिन्ही फलंदाजांनी तिशीच्या वर योगदान दिल्याने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८६ धावांची आघाडी मिळवली. भारतातर्फे तब्बल १० खेळाडूंनी गोलंदाजीचा सराव केला. मोहम्मद शमीने तीन, रविचंद्रन अश्विनने दोन बळी मिळवले. चक्क विराट कोहलीनेदेखील सात षटके गोलंदाजी करत एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९२ षटकांत सर्वबाद ३५८

क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश (पहिला डाव) : १५१.१ षटकांत सर्वबाद ५४४

भारत (दुसरा डाव) : ४३.४ षटकांत २ बाद २११ (मुरली विजय १२९, लोकेश राहुल ६२; डी’आर्सी शॉर्ट १/३४