राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

विजय बजरंग, शाहू सडोली, बंडय़ा मारुती, जय भारत, अमर क्रीडा, ओम कबड्डी, गोल्फादेवी, सतेज, शिवशंकर, विजय क्लब, जॉली क्लब, अंकुर स्पोर्ट्स यांनी शिवाई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांमध्ये बाद फेरी गाठली. महिलांमध्ये शिवशक्ती, अमरहिंद, डॉ. शिरोडकर, मुंबई पोलीस, महात्मा गांधी, होतकरू, संघर्ष, राजामाता जिजाऊ  यांनी बाद फेरीत प्रवेश केला.

मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या अ-गटात विजय क्लबने उपनगरच्या उत्कर्षला ३०-२६ असे नमवले. विजयने मध्यंतरातील ११-१६ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत हा विजय साकारला. झैद कवठकर, विजय दिवेकर, प्रीतम लाड या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर विजय बजरंगनेदेखील उत्कर्षला ३०-२२ असे पराभूत केले. दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे उत्कर्षला मात्र साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. अक्षय उगाडे, आकाश निकम यांच्या पल्लेदार चढाया, अरुण पाटील, गणेश हातकर यांच्या भक्कम पकडी या सामन्यात महत्त्वाच्या ठरल्या.

क-गटात सतेजने विजय नवनाथवर ३०-१५ असा विजय मिळवला. नीलेश काळभोर, सुनील दुबिले, सचिन पाटील या विजयाचे शिल्पकार ठरले. गोल्फादेवीबरोबर पराभूत झाल्यामुळे बाद फेरी गाठण्यास सतेजला हा विजय महत्त्वाचा होता.

शिवशंकरने फ-गटात शिवशक्तीला २७-१८ असे, तर अमर क्रीडा मंडळाला १९-१८ असे पराभूत करीत धडाक्यात बाद फेरी गाठली. सूरज बनसोडे, गणेश जाधव, अँलन डिसोझा, सौरभ शिंदे, सोमनाथ कोळी या दोन्ही सामन्यात चमकले.

महिलांच्या अ-गटात शिवशक्तीने नाशिकच्या एसपीएमचा ४८-१६ असा धुव्वा उडवत आरामात बाद फेरी गाठली. पूजा यादव, सुधा शेलार यांच्या धारदार चढाया, तर पौर्णिमा जेधे, रेखा सावंत यांच्या भक्कम पकडींना याचे श्रेय जाते. अभिलाषा दातीर, वृषाली धोत्रे नाशिककडून चांगल्या खेळल्या. महात्मा गांधीने ब-गटात अनिकेत मंडळाचा ४७-२८ असा पाडाव केला. पूजा किणी, सायली जाधव, प्रतीक्षा मांडवकर, मीनल जाधव यांच्या खेळाने हा विजय साकारला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात डॉ. शिरोडकरनेदेखील अनिकेतवर ४८-३९ अशी मात करीत बाद फेरी गाठली. धनश्री पोटले, मेघा कदम, नेहा कदम यांच्या चतुरस्र खेळाने हा योग जुळून आला.