22 October 2018

News Flash

जळगावचा विजय चौधरी दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीची गदा आणि एक लाख रुपये पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Untitled-42

‘महाराष्ट्र केसरी’ची चांदीची गदा कोणाच्या खांद्यावर असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना दुसऱ्या फेरीत शेवटच्या ३० सेकंदांत जळगावच्या विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला चीतपट केले आणि सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. सलग दुसऱ्या वर्षी हा मानाचा किताब पटकावणारा तो सहावा मल्ल ठरला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या निनादात विजयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीची गदा आणि एक लाख रुपये पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
कुस्ती चाहत्यांच्या मनात ही लढत चीतपट होण्याची इच्छा होती. अहमदनगरनंतर चीतपटचे क्षण पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा नागपुरात पूर्ण झाली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या चिटणीस पार्कच्या आखाडय़ात लाल पोशाख परिधान केलेला विक्रांत जाधव, तर निळा पोशाख परिधान केलेला विजय चौधरी उतरला. दोन्ही मल्ल एकमेकांसमोर आल्यानंतर कोण बाजी मारेल, अशी हजारो प्रेक्षकांना उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकांचे पट काढण्याचे प्रयत्न केले. पहिल्या फेरीत जाधव ० तर चौधरीला ३ गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्या फेरीत विक्रांतने पलटी देत २ गुण मिळवले. २-३ अशी गुणसंख्या झाली असताना विजयने १ गुण मिळवला आणि त्याची गुणसंख्या ४ झाली. दुसऱ्या डावात ४-२ गुण विजयच्या बाजूने असताना विक्रांतने सालटो डाव मारण्याचा प्रयत्न केला. विजयने तो डाव उधळून लावत त्याला चीतपट केले.
अन्य गटातील विजेते
१७ किलो वजनगट- माती विभाग : १. ज्योतिबा अरकले (सोलापूर), २. शरद पवार (लातूर), ३. सागर मारकड (पुणे), ४. संतोष हिरगुडे (कोल्हापूर)
६५ किलो गट – माती विभाग : १. सरोदे (सोलापूर) , २. विष्णू भोसले (लातूर), ३. किरण माने (सोलापूर)
७० किलो गट- माती विभाग : १. अशफाक शहा (औरंगाबाद ), २. विकास बंडगर (सोलापूर), ३. बाबासाहेब डोंबाळे (पुणे ), ४. लखन माळी (धुळे)
५७ किलो वजन गट : १. विजय पाटील (कोल्हापूर जिल्हा), २. पंकज पवार (लातूर), ३. शुभम थोरात (पुणे शहर), ४. बापू कोळेकर (सांगली)
६१ किलो वजन गट : १. सोनबा गोंगाणे (कोल्हापूर जिल्हा), २. सुरज कोकाटे (पुणे), ३. तुकाराम शितोळे (पुणे शहर), ४. बापू जरे (बीड)
६५ किलो वजन गट : १. विशाल माने (कोल्हापूर), २. अक्षय हिरगुडे (कोल्हापूर), ३. सागर लोखंडे (पुणे जिल्हा), ४. संदेश काकडे (पिंपरी चिंचवड)
७० किलो गादी वजन गट : १. अशफाक शहा (औरंगाबाद), २. विकास बनगर (सोलापूर), ३. बाबासाहेब डोमाळे (पुणे)
८६ किलो गट -माती : १. दत्ता नराळे (सोलापूर), २. नासीर सैय्यद (बीड), ३. हर्षवर्धन थोरात (सांगली)
९७ किलो वजन गट – माती : १. तेजस वारंजळ (पुणे), २. शुभम सिद्धनाळे (कोल्हापूर), ३. तानाजी झुकरके
६१ किलो गट – माती विभाग : १. उत्कर्ष काळे (पुणे ), २. माणिक करांडे (कोल्हापूर), ३. आकाश आसवले
७४ किलो गट -माती विभाग : १. रवींद्र करे (पुणे), २. किरण अनुसे (संगली), ३. अब्दूल सोहेल (अमरावती), ४. कृष्णकांत कांबळे (कोल्हापूर).

जिंकण्याचा आत्मविश्वास होता -विजय चौधरी
‘‘सलग दुसऱ्यांदा हा किताब मिळवू शकेन, हा आत्मविश्वास असल्यामुळे त्या पद्धतीने मी खेळलो. शिवाय माझ्या प्रशिक्षकांनी माझ्याकडून तशी मेहनत करून घेतली होती. आपल्यापुढे प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याचे डावपेच बघितल्यानंतर त्या पद्धतीने माझे प्रशिक्षक माझ्याकडून सराव करून घेत होते आणि त्याचा मला फायदा झाला,’’ असे विजय चौधरीने सांगितले. माती विभागात कुस्ती खेळल्यानंतर गादीवर कुस्ती खेळताना दोन्ही ठिकाणची खेळण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक पडतो का, असे विचारले असता विजय म्हणाला, ‘‘ मुख्यमंत्र्यांनी पोलिसात शिपाई म्हणून नोकरी न देता चांगले पद देऊन सन्मान केला पाहिजे. आता रुस्तम-ए-हिंद केसरीची तयारी करणार असून ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या दिवसात तयारी करणार आहे.’’
पोलीस दलात नोकरी देऊ -मुख्यमंत्री
‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला पोलीस दलात नोकरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘‘महाराष्ट्रात कुस्तीला प्राधान्य देऊन त्यांना खेळाडूंना जी काही मदत लागेल, ती राज्य सरकार करणार आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला पोलीस दलात नोकरी दिली जाणार असली, तरी त्याला कुठल्या पदावर घेण्यात येईल, हे मात्र वेळप्रसंग पाहून ठरविण्यात येईल,’’ असेही फडणवीस म्हणाले.

First Published on January 11, 2016 3:25 am

Web Title: vijay chaudhari win maharashtra kesari title second time at nagpur
टॅग Vijay Chaudhari