विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई आणि विदर्भापाठोपाठ महाराष्ट्राच्या संघानेही आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. साखळी फेरीत आपला दुसरा सामना खेळणाऱ्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा १०५ धावांनी धुव्वा उडवला. अंकित बावनेचं नाबाद शतक आणि त्याला ऋतुराज गायकवाड आणि नौशाद शेख यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी ३४४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र सलामीवीर विजय झोल आणि कर्णधार राहुल त्रिपाठी ठराविक अंतराने माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राचा संघ काहीकाळ संकटात सापडलेला दिसला. मात्र यावेळी अंकित बावनेने ऋतुराज गायकवाडच्या साथीने भागीदारी रचत महाराष्ट्राचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. ऋतुराज माघारी परतल्यानंतर नौषाद शेखनेही आक्रमक फलंदाजी करत अंकितला उत्तम साथ दिली. या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ३४३ धावांपर्यंत मजल मारली. उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

महाराष्ट्राने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा संघ आक्रमक सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. मात्र प्रदीप दधेच्या अचुक फेकीवर सलामीवीर प्रशांत गुप्ता धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर उत्तर प्रदेशचा एकही फलंदाज मैदानात तळ ठोकून राहू शकला नाही. मधल्या फळीत मोहम्मद सैफचा अपवाद वगळता एकही फलंदाज महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरलेले उत्तर प्रदेशचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. ज्याचा फायदा घेत उत्तर प्रदेशला २३८ धावांमध्ये गारद करण्यात महाराष्ट्राला यश आलं. महाराष्ट्राकडून शम्ससुझमा काझीने सर्वाधिक ३ तर प्रदीप दधे, सत्यजित बच्छाव आणि श्रीकांत मुंडे यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र ३४३/५, अंकित बावने नाबाद ११७, नौषाद शेख ६९, ऋतुराज गायकवाड ५६. सौरभ कुमार २/५१, कार्तिक त्यागी २/७८ विरुद्ध उत्तर प्रदेश सर्वबाद २३८, मोहम्मद सैफ ४९. शम्ससुझमा काझी ३/३८, सत्यजित बच्छाव २/२५. निकाल – महाराष्ट्र १०५ धावांनी विजयी