२०१७-१८ या हंगामातला मुंबईच्या संघाचा प्रवास आज अखेर संपुष्टात आलेला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नवी दिल्लीच्या पालम मैदानावर खेळवल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्राने मुंबईवर ७ गडी राखून मात करत मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी आज चांगलीच निराशा केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाची सुरुवात अडखळती झाली. पृथ्वी शॉ, कर्णधार आदित्य तरे आणि सिद्धेश लाड हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे काहीकाळासाठी बिकट अवस्था झालेल्या मुंबईला श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांनी भागीदारी करुन सावरलं. मात्र श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर मुंबईचे उर्वरित फलंदाज महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. सुर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत सामन्यात ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. महाराष्ट्राकडून प्रदीप दधेने ३ तर प्रशांत कोरेने २ बळी मिळवले.

मुंबईने दिलेल्या २२३ धावसंख्येचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या संघाची सुरुवातही काहीशी अडखळती झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघ्या १२ धावांवर शिवम मल्होत्राच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. मात्र यानंतर श्रीकांत मुंढे आणि कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी मुंबईच्या गोलंदाजांना यथेच्छ समाचार घेत शतकी भागीदारी केली. श्रीकांतने ७० धावांची खेळी केली मात्र राहुल त्रिपाठीचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता अंकित बावने आणि नौशाद शेखने पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी करुन पूर्ण केली.

संक्षिप्त धावफलक : मुंबई २२२/९, सुर्यकुमार यादव ६९, श्रेयस अय्यर ३५. प्रदीप दधे ३/५७, प्रशांत कोरे २/३४.  विरुद्ध महाराष्ट्र २२४/३,  श्रीकांत मुंढे ७०, नौशाद शेख ५१. शिवम मल्होत्रा १/२९ निकाल – महाराष्ट्र ७ गडी राखून विजयी