विजय हजारे करंडकात पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या संघाने बिहारचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने बिहारचा 9 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत बिहारला 69 धावांमध्ये गारद केलं. यानंतर केवळ एका गड्याच्या मोबदल्यात मुंबईने बिहारने दिलेलं आव्हान पूर्ण करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तुषार देशपांडेने बिहारच्या डावाला खिंडार पाडत सामन्यावर मुंबईचं वर्चस्व स्थापन केलं. बिहारचा एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. तुषार देशपांडेला शम्स मुलानीने 3 तर कर्णधार श्रेयस अय्यरने 1 बळी घेत चांगली साथ दिली. बिहारकडून बाबुल कुमार आणि मोहम्मद रेहमत्तुला हे खेळाडू दोन आकडी धावसंख्या गाठू शकले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. अखिल हेरवाडकर आणि रोहित शर्मा यांनी संघाचं अर्धशतक फलकावर लावलं. यानंतर अखिल हेरवाडकर आशुतोष अमनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र तोपर्यंत मुंबईने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. यानंतर रोहित शर्माने आदित्य तरेला सोबत घेऊन मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.