रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेत आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. दुसऱ्या सामन्यात विदर्भाने जम्मू काश्मीरवर ७३ धावांनी मात केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने जम्मू काश्मीरसमोर २४६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र त्याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरचा डाव १७२ धावांमध्ये आटोपला.

अवश्य  वाचा – विजय हजारे करंडक – मुंबईची गुजरातवर ४१ धावांनी मात, सिद्धेश लाडचं आक्रमक शतक

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विदर्भाकडून गणेश सतीशने आक्रमक ९४ धावांची खेळी केली. अवघ्या ६ धावांनी गणेशचं शतक हुकलं. विदर्भाचा कर्णधार फैज फजल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. मोहम्मद मुदासिरने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फजलचा त्रिफळा उडवला. यानंतर गणेश सतीशचा अपवाग वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. मात्र प्रत्येकाने गणेश सतीशसोबत छोटी-छोटी भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात मदत केली. जम्मू काश्मीरकडून उमर नाझीरने ३ तर परवेझ रसूल आणि राम दयालने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!

विदर्भाने दिलेल्या २४६ धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तरादाखल जम्मू काश्मीरच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. श्रीकांत वाघने काश्मीरच्या सलामीवीरांना माघारी धाडत विदर्भाला पहिलं मोठं यश मिळवून दिलं. यानंतर प्रणव गुप्ताही उमेश यादवच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर बनदीप सिंह आणि अखेरच्या फळीत राम दयालने केलेल्या अर्धशतकांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आव्हानात्मक खेळी करु शकला नाही. जम्मू काश्मीरच्या उर्वरित सर्व फलंदाजांनी मैदानात केवळ हजेरी लावणं पसंत केलं. अखेर ३८.४ षटकात १७२ धावांमध्ये जम्मू काश्मीरचा डाव आटोपला.