विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळ संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसनने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. गोव्या विरुद्ध सामन्यात संजू सॅमसनने द्विशतकी खेळी केली. नाणेफेक जिंकत केरळने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केरळचे सलामीवीर रॉबीन उथप्पा आणि विष्णु विनोद झटपट माघारी परतले. यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसन आणि सचिन बेबी यांनी गोव्याच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली.

संजू सॅमसनने १२९ चेंडूत २१२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २१ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. सचिन बेबीनेही त्याला १२७ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या जोरावर केरळने ३७७ धावांपर्यंत मजल मारली. या कामगिरीसह संजू सॅमसनने सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

सुयश प्रभुदेसाईचा अपवाद वगळता गोव्याच्या सर्व गोलंदाजांवर केरळच्या फलंदाजांनी प्रहार केला. लक्ष्य गर्ग आणि दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. केरळचा कर्णधार रॉबिन उथप्पा obstructing the field नियमाअंतर्गत बाद झाला.