News Flash

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचे वर्चस्व!

सलग चौथ्या विजयासह मुंबईने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखतानाच बाद फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

राजस्थानवर ६७ धावांनी मात; बाद फेरीसाठी प्रबळ दावेदारी

कर्णधार श्रेयस अय्यरने (१०३ चेंडूंत ११६ धावा) साकारलेल्या सलग दुसऱ्या शतकाच्या बळावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत राजस्थानचा ६७ धावांनी सहज पराभव केला. सलग चौथ्या विजयासह मुंबईने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखतानाच बाद फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत ७ बाद ३१७ धावा केल्या. महाराष्ट्राविरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी साकारणाऱ्या श्रेयसने पुन्हा एकदा शतकी नजराणा पेश करताना ११ चौकार आणि तीन षटकारांसह ११६ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान श्रेयसने सर्फराज खानसह (३०) तिसऱ्या गड्यासाठी ९६, तर सूर्यकुमार यादवसह (२९) चौथ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी रचली. याशिवाय सलामीवीर पृथ्वी शॉ (३६) आणि यशस्वी जैस्वाल (३८) यांनीसुद्धा मुंबईसाठी मोलाचे योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना शार्दूल ठाकूर (४/५०) आणि धवल कुलकर्णी (३/२६) या मुंबईच्या अनुभवी वेगवान जोडीपुढे राजस्थानची फलंदाजी ढेपाळली. मणिपाल लोमरोर (७६) वगळता एकही फलंदाज झुंज न देऊ शकल्यामुळे राजस्थानचा डाव ४२.२ षटकांत २५० धावांत आटोपला. सोमवारी हिमाचल प्रदेशविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत मुंबईला विजयाचे पंचक साकारण्याची संधी आहे. तसेच राजस्थानने दिल्लीला पराभूत केल्यास मुंबईला अग्रस्थानासह बाद फेरी गाठता येईल.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ५० षटकांत ७ बाद ३१७ (श्रेयस अय्यर ११६, यशस्वी जैस्वाल ३८; शुभम शर्मा ३/५९) विजयी वि. राजस्थान : ४२.२ षटकांत सर्व बाद २५० (मणिपाल लोमरोर ७६, मणिंदर सिंग ४०; शार्दूल ठाकूर ४/५०, धवल कुलकर्णी ३/२६)

५ मुंबईकडून या स्पर्धेत सर्वाधिक पाच शतके झळकावली गेली आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांची प्रत्येकी दोन, तर सूर्यकुमार यादवच्या एका शतकाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:43 am

Web Title: vijay hazare cricket tournament mumbai shreyas century akp 94
Next Stories
1 भारत-जर्मनी हॉकी मालिका : जर्मनीकडून भारतीय महिला संघाचा धुव्वा
2 शिखा, वेदा यांना वगळले
3 इंग्लंडचा भारत दौरा : चौथ्या कसोटीत फलंदाजांसाठी नंदनवन?
Just Now!
X