विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष पृथ्वी प्रक्षेपणाकडे असेल. पृथ्वी शॉ याच्या भरारीमुळे मुंबईच्या संघाने जेतेपदाच्या दावेदारीची कक्षा गाठली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशला नमवून मुंबई चौथे जेतेपद जिंकेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

पृथ्वीने हजारे करंडक स्पर्धेत एकूण सर्वाधिक ७५४ धावा केल्या आहेत. यात नाबाद १०५, नाबाद २२७, नाबाद १८५ आणि १६५ या खेळींचा समावेश आहे. त्यामुळे निवड समितीचे लक्ष स्वाभाविकपणे त्याच्यावर असेल. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माने विश्रांती घेतल्यास पृथ्वी या जागेसाठी दावेदारी करू शकतो.

वेळ : सकाळी ९ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

४ आतापर्यंत तीन हजारे करंडक जेतेपदे खात्यावर असणारा मुंबईचा संघ चौथ्या अजिंक्यपदासाठी उत्सुक आहे. २०१८-१९ मध्ये त्यांनी अखेरचे जेतेपद जिंकले होते.

३ उत्तर प्रदेशचा संघ तिसऱ्यांदा हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे.

करण, उपेंद्र, अक्षदीपवर भिस्त

करण (२२५ धावा), यष्टीरक्षक-फलंदाज उपेंद्र यादव (२७६ धावा) आणि अनुभवी अक्षदीप नाथ यांच्यावर उत्तरेची भिस्त आहे. सलामीवीर अभिषेक गोस्वामी (१८७ धावा) आणि माधव कौशिक धडाकेबाज सलामी देण्यात वाकबदार आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो. गुणी दयालकडे मिचेल स्टार्कप्रमाणे वेग नाही.

मुंबईचे अन्य फलंदाज झाकोळले

पृथ्वीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबईचे अन्य फलंदाज झाकोळले. पण तरीही यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे, अष्टपैलू शाम्स मुलानी किंवा शिवम दुबे यांच्यामुळे मुंबईची फलंदाजीची फळी मजबूत आहे. त्यामुळे पृथ्वी अंतिम सामन्यात अपयशी ठरल्या यापैकी एखादा कामगिरी उंचावू शकेल. मुंबईच्या वेगवान माऱ्याची मदार अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (१४ बळी), तुषार देशपांडे आहे. याशिवाय प्रशांत सोलंकी, तनुष कोटियन आणि शाम्स हे फिरकी त्रिकूट त्यांच्याकडे आहे.