मध्यमगती गोलंदाज डॉमनिक मुथ्थुस्वामीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पश्चिम विभागीय विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राने मुंबईवर सहा विकेट राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईला ४४.१ षटकांत सर्व बाद २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. अखिल हेरवाडकर व वासिम जाफर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. अखिलने दमदार ४४ धावा केल्या. जाफरने सात चौकार व तीन षटकारांसह ८४ धावा टोलविल्या. अक्षय दरेकरने अखिलला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर मुंबईकडून अपेक्षेइतकी मोठी भागीदारी झाली नाही. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (४०) याचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज आश्वासक कामगिरी करू शकला नाही. डॉमनिकने मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडविताना केवळ २५ धावांमध्ये सहा बळी घेतले.
त्यानंतर रोहित मोटवानी व अंकित बावणे यांनी शानदार अर्धशतके टोलविल्यामुळे महाराष्ट्राने केवळ चार फलंदाजांच्या मोबदल्यात विजय मिळविला. मोटवानीने पाच चौकारांसह ५९ धावा केल्या. बावणेने पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या.  विजय झोल (३८) व संग्राम अतितकर (३२) यांनीही महाराष्ट्राच्या विजयाला हातभार लावला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४४.२ षटकांत २११ (अखिल हेरवाडकर ४४, वासीम जाफर ८४, सूर्यकुमार यादव ४०; डॉमनिक मुथ्थुस्वामी ६/२५) पराभूत वि. महाराष्ट्र : ४८ षटकांत ४ बाद २१४ (विजय झोल ३८, रोहित मोटवानी ५९, अंकित बावणे नाबाद ७८, संग्राम अतितकर ३२; शार्दूल ठाकूर २/३४)