पहिल्या सामन्यात बडोद्याकडून पराभूत झालेल्या विदर्भाला विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील दुसऱ्या  सामन्यातही पंजाबकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. विदर्भाचे फलंदाज अपयशी ठरल्याने एकतर्फी झालेल्या सामन्यात पंजाबने तब्बल १४१ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या विजयात गुरकिरत मान आणि मयंक मरकडेची खेळी प्रभावी राहिली.

बेंगळुरूच्या अलूर मदानावर नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मनन व्होरा आणि शुभम गिलने चांगली सुरुवात करून दिली आणि ४९ धावांची भागीदारी केली. शुभम गिल २४ धावांवर असताना उमेश यादवचा बळी ठरला, तर मनन व्होराला कर्णधार फैज फजलने २७ धावांवर तंबूत परतवून लावले. त्यानंतर पंजाबचा कर्णधार मनदीप सिंग(२३) युवराज सिंग(४१) धावांवर बाद झाले. विदर्भाच्या गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देत गुरकिरतने  अर्धशतक झळकवत नाबाद राहिला. तळातील फलंदाजांनी धोटी भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले. पंजाबने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या. विदर्भाकडून श्रीकांत वाघने ३, फैजने २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात विदर्भाची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अथर्वला अर्शदीप सिंगने बाद करून विदर्भाला पहिला धक्का दिला, तर चौथ्याच षटकांत फैजही केवळ ६ धावा करून परतला. पंजाबच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन करत केवळ ३६ धावांवर निम्मा संघ परतावून लावला. मात्र, गणेश सतिश व श्रीकांत वाघने डाव सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ६३ धावांची भागीदारी करत १२५ धावांचा पल्ला गाठण्यात मोलाचे योगदान दिले. मात्र ही जोडी फार काळ टिकली नाही आणि श्रीकांत ३३ धावांवर मरकडेचा शिकार ठरला, तर सतिशने आपले अर्धशतक पूर्ण केले. सतिश ६० धावांवर असताना कर्णधार गुरकिरतने त्याची खेळी संपुष्टात आणली. तळातील फलंदाजही विशेष कामगिरी बजावू शकले नाही आणि विदर्भाचा डाव ४०.५ षटकांत १३७ धावांवर आटोपला. पंजाबकडून मयंक मरकडेने ३, मनदीप, अर्शदीप आणि मनप्रीतसिंग ग्रेवालने प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब : ५० षटकांत ७ बाद २७८ (युवराज सिंग ४१, गुरकिरत ८५; श्रीकांत वाघ ३/६९, फैज फजल २/४१) विजय वि. विदर्भ ४०.५ षटकांत सर्वबाद १३७ (गणेश सतिश ६०, श्रीकांत वाघ ३३; मयंक मरकडे ३/३७, मनदीप सिंग २/१५, मनप्रीत ग्रेवाल २/१६, अर्शदीपसिंग २/१७)